मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत असतानाच, आज मातोश्रीवर खासदार सुप्रिया सुळे पोहोचल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट राजकीय चर्चेसाठी नसून सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी असल्याचे समोर आले आहे.
रेवती सुळे-सारंग लखानी यांचा विवाह सोहळा
सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिचे लग्न नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्याशी ठरले आहे. या शाही विवाह सोहळ्याची लगबग आता पवार आणि सुळे कुटुंबियांच्या घरात सुरू झाली असून, सुप्रिया सुळे स्वतः जवळच्या स्नेहींना आणि राजकीय नेत्यांना निमंत्रण देत आहेत. याच निमित्ताने त्यांनी आज ठाकरे कुटुंबाची भेट घेऊन त्यांना लग्नाचे रितसर निमंत्रण दिले.
राजकारणापलीकडची मैत्री
पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांचे जुने आणि घरोब्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात हे संबंध अधिक दृढ झाले. राजकीय मतभेद आणि विचारधारा बाजूला ठेवून दोन्ही कुटुंबांमधील स्नेह कायमच दिसून आला आहे. आजच्या भेटीतही सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली, ज्यामध्ये प्रामुख्याने कौटुंबिक विषयांवर गप्पा झाल्याचे समजते.
२० जूनला मुंबईत रंगणार सोहळा
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा विवाह सोहळा २० जून २०२६ रोजी मुंबईत अत्यंत थाटामाटात पार पडणार आहे. या लग्नासाठी देशभरातील दिग्गज नेते आणि उद्योजक उपस्थित राहणार असून, मुंबईतील सोहळ्यानंतर दिल्लीत एक विशेष रिसेप्शनही आयोजित करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.